विना फवारणी कीड नियंत्रण

मित्रहो कीड नियंत्रण म्हटले कि तुम्हाला लगेच फवारणी पंप व कीटकनाशक आठवते का? जितकी पिके आहेत त्याच्या कित्येक पटीत किडी आहेत व त्याच्या कित्येक पटीत फवारणीच्या औषधी! शेतात कीड दिसून आली कि लगेच आपण औषधी दुकान गाठतो, औषध घेतो व फवारणी सुरु! अनेक शेतकरी बांधव एकाच वेळी चार पाच औषधी एकत्र करून फवारतात. काही काही शेतकरी बांधव तर अगदी कहर करतात, ठिबक मधून दोन औषधी सोडतात व फवारणीतून चार! शेतातल्या किडीविरुद्ध त्यांचे जणू काही युद्धच सुरु असते. आता पर्यंत आपल्या शेतात कितीतरी किडी आल्या असतील. अनेक वेळी आपण फवारणी करून त्यावर नियंत्रण मिळवले असेल. काही वेळा खूप फवारणी करून देखील कीड नियंत्रण झालेच नाही हा देखील अनुभव आपण घेतला असेल. इतक्या वर्षांपासून आपण कीटकनाशके फवारणी करत असून देखील आजपर्यंत एकाही किडीचे उच्चाटन झालेले नाही. उलटपक्षी नव्याने येणाऱ्या किडीत औषधाला सहन करायची क्षमता वाढलेली असते. मित्रहो या निरीक्षणानुसार कीडनियंत्रणासाठी आपल्याला औषध फवारणी व्यतिरिक्त इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार करायला हवा. असे करण्यासाठी तुम्हाला किडीच्या वाढीत अडचणी निर्माण करा...