फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

"मजुरांची" समस्या - नियोजन


शेतकरी, उद्योजक व कंत्राटदार यांना "मजुरांची" समस्या फार मोठी असते. एकतर मजूर मिळत नाहीत, मिळाले तर त्यांच्याजवळ योग्यता नसते, अपेक्षा मोठी असते, अनेक लोकं अंगकाढू असतात, शेतात चोऱ्या करतात, ऐन वेळी काम सोडून निघून जातात वगैरे.

सर्वच प्रश्नांना एकाच लेखात समाधान शोधता येणार नाही. इतकेच काय जर तुम्ही या ब्लॉग च्या खाली आपले मतव्यक्त केले, सूचना मांडल्या तर कालांतराने या लेखात सुधारणा करता येतील.

गरज हि शोधाची जननी असते. पोटाचा खड्डा भरणे हि मजुराची खरी गरज असते व म्हणूनच तो कामाचा शोध घेतो. मधल्या काळात सरकारने गरिबी रेषे खालील लोकांसाठी २ रु किलो तांदूळ, गहू असे प्रकार केल्याने "पोटाचा खड्डा भरणे" हि गरज संपली व मजुर मिळण्यास मोठी समस्या निर्माण झाली. अर्थात तरीही अनेक ठिकाणी मजूर उपलब्ध आहे कारण प्रत्येकाला फक्त पोटाचा खड्डा भरायचा नसतो. अन्नाच्या पलीकडे चांगले वस्त्र, चांगला निवारा, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, मुला-बाळांची लग्ने, मनोरंजन, पुरेशी व चांगली झोप, सुसंस्कृत मूल्यवर्धित जीवन, म्हतारपणासाठी जमा-पुंजी या देखील गरजा प्रत्येकाला असतात. शेतकरी किंवा उद्योजकाने या सर्व पुरवाव्या असे शक्य नाही. मूळ समस्या हि आहे कि सामन्य मजुरास या गरजांची जाणीव नसते. ती करून द्यायला हवी. अशी जाणीव करून देण्यासाठी ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, शिवाजीमहाराज, फुले, आंबेडकर अशा समाज सुधारकांच्या विचारांचा आधार घेता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची स्वत:ची वागणूक देखील तशीच हवी.
मजुरांना सिगारेट-बिडी-तंबाखू-दारू व तत्सम सवयी लावून गुलाम बनवणारे संस्कृतीहीन लोकं अनेक आहेत. ते चुकीचे आहे कारण जर तुम्ही साप पाळला तर तो तुम्हाला देखील चावू शकतो. सांस्कृतिक सीमेत राहून कुटुंबवत्सल माणसे नीवडणे व स्वत:देखील तसे रहाणे जास्त योग्य आहे. निसर्गाने समाज चांगला रहावा म्हणूनच कुटुंब वत्सलता निर्माण केलेली आहे, अनेक प्राणीमात्रात देखील तसे दिसते.

एकीकडे आपण गाईला आई मानतो, देवी ची पूजा करतो पण स्त्री जेव्हा खांद्याला खांदा लावून कामाला येते तेव्हा तिला दुय्यम लेखतो. मजुरी कमी देतो. यापेक्षाही गंभीर समस्या म्हणजे पुरुषी नजर. बाईमाणसाकडे वाईट नजरेने बघणे व चुकीच्या अपेक्षा करणे हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही काम देता म्हणजे मालक बनत नाही. आपल्या कामाशी मतलब ठेवणे व आपल्या कामेच्छा योग्य पद्धतीने पूर्ण करणे महत्वाचे आहे.

गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका घेणे किती योग्य आहे? अनेक शेतकरी बांधव फक्त शेतीच करतात. सोबत कुठलाही जोडधंदा, पूरक उद्योग करीत नाही. इतकेच काय आसपास च्या शेतकऱ्यांचा मिळून ग्रुप देखील बनवत नाहीत. अश्या परिस्थितीत ते वर्षातील मोजकेच दिवस मजुरास काम देवू शकतात. नियमित काम उपलब्ध नसल्याने देखील मजूर टिकत नाही.

माणसे हेरणे हे महत्वाचे काम आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार केला तेव्हा सर्व प्रथम गरज जाणवली ती मावळ्यांची. हे मावळे त्यांनी हेरले, त्यांना तयार केले व लाखोच्या मुघल फौजेला सळो कि पळो करून सोडले. तिथेतर जीवावर उदार व्हायचे होते!  दहीहंडी असो कि होळी, महाराजांची माणसे चपळ तरुण हेरत व त्यांना भरती करून घेत. हा सातत्याचा उद्योग असतो. 


काम करणे आणि काम जबाबदारी ने करणे यात अंतर आहे. कोण कसे काम करते आहे हे परखता यायला हवे. हे परखून व स्पष्टपणे मांडून चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

काम देणाऱ्याने माणसांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. अलीकडेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करते वेळी अनेक शेतकरी व मजुरांचा जीव गेला. तसे तर हे काम नित्याचे असते. एकाच वेळी इतकी मनुष्यहानी झाली याला काही सबळ कारणे असणारच. त्यात तांत्रिक करणे देखील असतीलच. शासकीय यंत्रणेची देखील चूक असू शकते. विषबाधा झाली हि जबाबदारी शेतकऱ्याची असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. बळी तो कान पिळी, सत्तेपुढे शहाणपण चालू शकत नाही. फवारणी करते वेळी योग्य ती काळजी घेतली गेली नाही. दुपारच्या वेळेसदेखील फवारणी केली, चुकीची फवारणी यंत्र वापरली व पिकात शिफारस न केलेले औषध फवारण्यात आले. शेतकऱ्याने स्वत:ची व मजुरांची काळजी घेणे महत्वाचे आहे. हे खोटे नाही.



काम करून घेता आले पाहिजे. एक माणूस एक काम करतो तेव्हा तो त्याची १०० टक्के शक्ती पणाला लावतो पण ते काम दोन माणसे करत असली तर ९० टक्केच ताकद लावतो. एकूण शक्ती २०० टक्के लागण्या ऐवजी १८० टक्केच लागते. जितकी माणसे जास्त तितका हा टक्का कमी होत जातो. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. शिवाय अश्या परिस्थितीत कुणा एकावर दोष येत नाही. त्यामुळे जगातील बहुतेक काम समूहानेच केली जातात. याला एक पर्याय आहे. कामे रिले पद्धतीने करणे. धावण्याच्या रिले प्रकारात चार गटातील पहिले चार खेळाडू धावतात व विशिष्ठ अंतरावरील पुढील धावपटूस हातातील रिले सोपवतात. तो पुन्हा तसेच करतो. यामुळे गटातील प्रत्येक धावपटू त्याचा १०० टक्के प्रयत्न करतो. मजुरांकडून काम करून घेते वेळी नियोजन रिले पद्धतीने केले तर जास्त चांगले होते.


यांत्रिकीकरण करणे: सर्वच कामे माणसे करू शकत नाही तिथे यंत्राची गरज असते. तसेच काही कामे यंत्रे करू शकत नाही तिथे माणसाला पर्यार्य नसतो. योग्य ठिकाणी यांत्रिकीकरण करायलाच हवे. खरेतर यांत्रिकीकरण व मनुष्यबळाची सांगड घालणे खूप महत्वाचे आहे. जी यंत्र माणसाची कार्यक्षमता वाढवतात ती जास्त महत्वाची आहेत, ती प्रामुख्याने खरेदी करवीत. ज्या यंत्रास चालवण्यात विशेष प्राविण्य लागते त्यासाठी लागणारा ऑपरेटर महागडा असू शकतो.

यंत्र घेतली कि त्याचा नियमित रखरखाव करणे अपरिहार्य असते. तसे नाही केले तर लाखाचे शंभर होऊन बसतात. म्हणूनच या रखरखावासाठी हुशार माणसे लागतात. एकूणच कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतकरी व उद्योजकास माणसे लागतीलच.

सर्वच प्रश्नांना एकाच लेखात समाधान शोधता येणार नाही. इतकेच काय जर तुम्ही या ब्लॉग च्या खाली आपले मतव्यक्त केले, सूचना मांडल्या तर कालांतराने या लेखात सुधारणा करता येतील.

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद