फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

शेतकरी आहात कि मेंढर?


सकाळ-संध्याकाळ चौकात उभे रहाणारे टवाळ, फेसबुक वरील स्क्रोलर, व्हाटसएपवरचे कंपलसिव्ह फॉरवर्डर सोडले तर प्रत्येकाला कृतीशील निर्णय घ्यावे लागतात.

मुद्दा हा आहे कि अनेक वेळा सोशल प्रुफ मुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यापासून स्वत:ला वंचित ठेवतात. जाण असून देखील चुकीचा निर्णय घेतात! माझ्या मते चांगला निर्णय घेण्यात सर्वात मोठी अडचण असते ती सोशल प्रूफची!

१९९५ सालमधील सप्टेंबर महिन्यातील घटना आहे, गुरुवार चा दिवस होता.  मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, मेस वरून कॉलेज कडे जायला निघालो व रस्त्यावर अचानक गर्दी वाढली. जो तो पुजेची थाळी घेवून जातांना दिसत होता. गणपती मंदिरावर अक्षरश: झुंबड उडालेली होती. मी आस्तिक असलो तरी फारसा मंदिरात जात नाही. झुंबडीत सामील न होणे बरे हा विचार करून मी कॉलेजला पोहोचलो. तिथे गर्दी कमी होती. उपस्थिती कमी असल्याने शिक्षकांनी पिरीयड ला ऑफ दिला. “गणपती दुध पीत असल्याची” बातमी कानावर आली. सर्व मंदिरातील गणपती दुध पीत होते. प्रत्येक भक्तासाठी “बाप्पाला” प्रसन्न करून घ्यायची हि “मोठी संधी” होती, त्यामुळे आज कॉलेजमध्ये पिरीयड होणार नाही हे माझ्या लक्षात आले व मी वाचनालयाकडे कूच केली. आज तिथे शांतता होती...हवी ती पुस्तकेहि मिळालीत. मी वाचनात दिवस घालवला.


सायंकाळी मेसवर पुन्हा हीच चर्चा रंगली. माझ्या समोर भौतिक शास्त्रात डिग्री करणारा एक विद्यार्थी बसला होता. तो “केशआकर्षणाचा नियम” समजावून सांगत होता. “बाप्पाचे तोंड सोंडेखाली असते व लोकं सोंडेच्या टोकावर चमचा धरत होते” या वरून “सोशल सायन्स” चा विद्यार्थी टीका करत होता. आमची चर्चा रंगली होती, तेव्हड्यात मागे बसलेल्या आजोबांनी त्याच्या समोरची थाळी जोरात आपटली, थाळीतील अन्न सर्वीकडे उडाले – धार्मिक भावनांची खिल्ली उडवल्यामुले “आजोबा चिडले”! आज आपल्या सर्वांना हे ठावूक आहे कि आजोबा सोशल प्रुफ ची शिकार होते. खरेतर बाप्पा कुणाच्याच चमच्यातील दुध पिला नव्हता पण तो (बाप्पा) फक्त पापी माणसाच्या चमच्यातील दुध पीत नाही अशी भावना असल्याने प्रत्येक व्यक्ती बाप्पा माझ्या चमच्यातील दुध पिला असेच सांगत होता. बाबासारखे भक्त या सर्व चक्रव्यूहात फसले होते.

सोशल प्रुफ चे दुसरे स्पष्ट उदाहरण म्हणजे हॉटेल मधली टीप व मालकाच्या काउंटरवर ठेवलेली पारदर्शी दान पेटी. हॉटेलमध्ये सेवा देणारे वेटर पगारी असतात. अनेक हॉटेल मध्ये “टीप देवू नये” असा बोर्ड असतो तरी बिल आले कि आपण “टीप” तर देतोच. बर टीप मध्ये दिली जाणारी नोट नव्वद टक्के वेळा फाटकी असते, ती इतर व्यवहारात खपणार नसते. जर बिल टेबलवर आले नाही तर आपण काउंटरवर बिल देण्यासाठी जातो. पारदर्शक दान पेटीत शंभर-पाचशे च्या कोऱ्या नोटा असतात. जर मालक ओळखीतला नसला व काउंटर वर इतर कुणी नसले तर आपण त्या दानपेटी कडे लक्षच देत नाही! पण समजा या ठिकाणावर तुमची ओळख पाळख असेल व तुमच्या “इमेज” चा प्रश्न असला तर “बायकोच्या साडीसाठी बाजूला काढून ठेवलेली ५००-१००० ची कोरी नोट” इथे धाराशाही होते! सोशल प्रुफ मुळेच आपण इथे बळी पडतो!

आपल्याकडे “हुंडा” हा एक सामाजिक बट्टा आहे. अनेक मंडळी मुलाचा संसार “सुखाचा” कसा होईल याकडे लक्ष देण्याएवजी मुलीच्या बापाकडून “जास्तीत जास्त” हुंडा कसा वसूल करता येईल याकडे लक्ष केंद्रित करतात. हुंडा जास्तीत जास्त मिळावा म्हणून बोलणीसाठी “हुशार” माणसांना सोबत नेले जाते. मग मुलाचा बाप सांगतो कि “आम्हाला फक्त मुलगीच हवी” पण सोबत नेलेला हुशार माणूस “आज काल काय रेट आहे”, अमक्याने इतके दिले वगैरे गोष्टी सांगून सोशल प्रुफ निर्माण करतो जेणे करून हुंड्याची रक्कम “मुलाच्या बापाच्या मनाप्रमाणे” येईल!

वरचा मुद्दा थोडा जास्तीच सिरीयस होता. कॉमेडी शो बद्दल तुमचे काय मत आहे? “कपिल चा शो” असो कि “चला हवा येवू द्या”. एका पाठोपाठ “हास्य” निर्माण केले जाते. अनेक वेळेला अपेक्षित ठिकाणी लोकात हसू पिकत नाही! खरे तर निर्माण केलेला विनोद फालतू असतो व प्रेक्षकांना हसू येतच नाही. या ठिकाणी सिद्धू सारक्या “हश्यांची” गरज असते. ते हसले कि त्या पाठोपाठ सर्वच हसू लागतात. अनेक वेळेला आपल्याला मुद्दा समजलेला नसतो पण “सिद्धू” हसतो म्हणून आपण हसतो!

समाजिक मान्यतेचा “उपयोग” करून घेणारा सर्वात मोठा उद्योग म्हणजे “जाहिरात उद्योग”. अमिताभ बच्चन ची “मॉके हात का खाना” वाली मसाल्याची जाहिरात असो कि “हागणदारीमुक्त” ची जाहिरात! आजकाल तर प्रत्येक दुसऱ्या जाहिरातीत “अमिताभ” असतोच! गेल्या तीन पिढ्या अमिताभला सिनेमात बघत आहे. त्याच्या भूमिका नेहमी चांगल्या व्यक्तिमत्वाच्या राहिल्या आहेत त्यामुळे आपल्या मनात तो हिरो आहे. तो म्हणेल ते खर. “अमिताभ”च्या या जाहिराती म्हणजे “सामाजिक मान्यतेचा” उत्तम नमुनाच आहे. (कुणीतरी जावून त्याला सांगावे...बाबा अमिताभ पुरे आता तुझा खोटारडेपणा!)

या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही त्यामुळे पारावरील चर्चेत असा कल दिसला कि कापूस लावू नये. जेव्हा सर्वांनी कापूस लवला तेव्हा रामूने आले लावले होते. त्याला खूप नफा झाला. संपूर्ण जिल्ह्यात रामू चर्चेचा विषय झाला. तेव्हा सर्वांनी आले लावावे! किसन ने हि गोष्ट ऐकली व आले लावायची खुणगाठ पक्की केली. सर्व जे पिक लावणार आपण तेच पिक लावायचे असे ठरवणे. किसन सोशल प्रूपला बळी पडला आहे.  रामूने मागील वर्षी कुणाचे न ऐकता "आले: लावले. यावर्षी तो कदाचित कापूस लावेल कारण इतर कुणीच कापूस लावणार नाहीये.  रामू पिकाचा नीट अभ्यास करतो. योग्य पिक निवडतो. इतरांच्या विरुद्ध निर्णय घेतो. त्यासाठी त्याने इतरांचा विरोध सहन केला आहे. तो सोशल प्रुफला बळी पडला नाही. किसन आणि रामू या दोघींच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीचा विचार प्रत्येक शेतकरी बांधवाने करावा.

एक शेतकरी म्हणून तुम्ही कुठल्या कुठल्या सोशल प्रुफला बळी पडतात याचा विचार करायला हवा. जसे..

कोणते पिक घ्यायचे? कोणते बियाणे वापरायचे? खतांचे डोसेस कसे द्यायचे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे “इतराकडे” बघून असे असेल तर “या महत्वाच्या बाबतीत तुम्ही सोशल प्रुफ चा आधार घेत आहात” हे स्पष्ट आहे. खरे तर या साठी तुम्ही बाजाराचे ज्ञान, विज्ञान, प्रयोगावर आधारित निष्कर्षावर अवलंबून रहायला हवे. जर तुमचे बहुतेक शेजारी तूर लावणार असतील तर तुम्ही तूर न लावणे जास्त संयुक्तिक ठरेल! खरे तर एकाच पिकाच्या मागे धावण्याऐवजी तुम्ही काही भागात हिरवा भाजीपाला, काही भागात फळभाज्या, एका भागात जनावरांसाठी वैरण, एका भागात बहुवार्षिक पिक व एका भागात व्यापारी पिकाचे दोन-तीन प्रकार अशी विभागणी करायला हवी. बियाणे कोणते वापरावे हे ठरवण्यासाठी तुम्ही विभागातील अधिकारी व्यक्तीचा सल्ला घेवू शकता किंवा स्वत: वेगवेगळ्या वाणांचा अभ्यास करू शकता. खतांचे डोसेस ठरवण्यासाठी मृदा परीक्षण, निवडलेल्या वाणाची गरज व खतातील नवीन तंत्रज्ञान याचा अभ्यास करू शकता. सर्व हंगाम एकाच वेळी निघेल बघण्या ऐवजी..वेगवेगळ्या वेळी उत्पादन निघून वेगवेगळ्या बाजारात पाठवता येईल हे पहिल्याने तुम्हाला जादा भाव मिळू शकेल.

तुम्ही मेंढरांची सवय बघितली आहे क? ते पुढच्या च्या मागे चालतात. पुढचा खड्यात तर मागचा पण खड्यात. शेतकरी दादा तुम्ही या मेंढरा सारखे तर नाही करत?

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद