आवळा देवून कोहळा घेणाऱ्या पासून रहा सावध!
काही वर्षापूर्वी आम्हाला एका कौटुंबिक जेवणाचे आग्रही आमंत्रण मिळाले. या कुटुंबाशी आमची फक्त तोंड ओळखच होती. ते आमच्या बैठकीतली नसल्याने थोडे हीचकिचतच आम्ही निमंत्रण स्वीकारले. अंदाजानुसार हि सायंकाळ अतिशय कांटाळवाणी ठरली. पण इलाज नव्हता. देवाणघेवाण आली. आम्ही देखील त्यांना निमंत्रण दिले. पुन्हा एका कंटाळवाण्या सायंकाळचा मुहूर्त ठरला. हा क्रम असाच सुरु राहिला. अश्या कितीतरी सायंकाळी "अक्षरशः वाया गेल्या".
आता संदर्भ बदलले असले तरी लग्नात कपडे देवाण घेवाण सुरूच आहे. देवाणघेवाणीच्या कार्यक्रमातून आलेल्या कापडांनी आमचे एक कपाट भरून पडले आहे कारण आम्ही फक्त स्वत: निवडलेलेच कपडे घालतो. मंदबुद्धी नातेवाईक हे कधी लक्षात घेतील कोण जाणे.
आजकाल गल्ली बोळातील दुय्यम दर्जाचे नेते येता-जाता आपल्याला नमस्कार घालतात. या लोकांना धड बोलता येत नाही. कोणतेच सामाजिक प्रश्न समजून घ्यायची यांची बौद्धिक ताकद नसते. समजले तरी अडचणी सोडवण्याची धमक त्यांच्यात नसते. अगदी नित्याची साफसफाई करून घेणे, कचरा कुंड्या वेळेवर उचलवून घेणे त्यांना जमत नाही. कुठल्यातरी मोठ्या नेत्याच्या फेकलेल्या तुकड्यावर हे जगत असतात. पण मोठ्या नेत्याच्या मर्जीत राहण्यासाठी वार्डात ओळखपाळख ठेवणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. मग ते गल्लीतील अधेड वयातील मुलामध्ये उठबस करतात. गणपती व दुर्गोत्सव असे कार्यक्रम घेतात. वर्गणी गोळा करतात व उरलेल्या पैशात या मुलांची खायची-प्यायची हौस भागवतात. त्यांचा येत-जाता नमस्कार हा फक्त या वर्गणी पुरता असतो. जर तुम्ही विनाकारण त्यांना तूल दिली तर तुमची ५००० रु ची पावती ते हक्काने फाडून घेतात. जर तुम्ही नमस्कार-चमत्कार नाही केला तर २५१/- च्या पावतीवर देखील भागते.
मार्केटिंग मध्येही देवाणघेवाणीच्या पद्धतीचा उपयोग करून नको त्या वस्तू माथी मारल्या जातात. नुकत्याच एका कृषीप्रदर्शनात गेलो. आत प्रवेश केल्यावर विविध कंपन्यांचे स्टोल लागलेले होते. एका कोपऱ्यात एक माणूस रंगीबेरंगी आकर्षक पिशव्या वाटत होता. घ्या हो, गिफ्ट आहे, पॅम्प्लेट ठेवायला कामी येईल. मी घेतली. त्यावर कंपनीचे नाव, उत्पादने छापली होती. फिरत फिरत पुढे गेलो. तिथे एका दालनात गेल्यावर त्याच कंपनीचा स्टोल होता. माझ्या हातातली पिशवी पाहून त्या कंपनीच्या स्त्री प्रतिनिधीने अगदी हात धरून स्टोल मध्ये ओढले. आग्रह करून करून उत्पादनांची माहिती दिली. माझे नाव, फोननंबर लिहून घेतले. कोणते पिक लावले आहे? हों का? या पिकासाठी आमचे खास उत्पादन आहे. प्रदर्शनात खास सूट आहे. घ्याच! वास्तविक पाहता शेतीत वापरायच्या वस्तू म्हणजे काही "साडी-चोळी" नाही. पण पिशवी घेवून मी चूक केली होती. आता तोंडघशी पडण्याशिवाय पर्याय नव्हता. साडेपाच हजाराचा चुना लागला. आवळा देवून कोहळा घेतला हरामखोरांनी!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा