फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

बुडीत खात्याचा भरणा!


तुम्ही एखादा रटाळ सिनेमा तीन तास पहिला आहे का? नागपूरला कामानिमित्त वरिष्ठांसोबत गेलो होतो. मध्ये पाच ते सहा तास असा वेळ होता जो कसा काढायचा हा प्रश्न.

एका सिनेमाचा प्रोमो बघितला होता. दिग्दर्शक नावाजलेले, अभिनेते देखील नावाजलेले – सिनेमा चांगला असणार! वेळ चांगला जाईल हा विचार करून जवळच्या एका थीएटर मध्ये गेलो. सिनेमा भयाण रटाळ निघाला. अजून दोन तास हे झेलले तर उगाच मूडचा पिचका होईल हा विचार करून आम्ही बाहेर आलो. आता तुम्ही म्हणाल पण तिकिटाचे पैसे वाया गेले ना?

यालाच म्हणतात बुडीत खात्याचा भरणा! पैसे तर तिकीट काढले तेव्हाच गेलेत. तो निर्णय चुकीचा होता हे लक्षात आल्यावर त्यात वाया जाणारे दोन तास वाचवणे आवश्यक होते! बाहेर लॉबित आल्यावर तिथे कॉफीचे झुरके घेत घेत चांगल्या गप्पा झाल्या. साहेबांनी “आपली उत्पादने ग्राहकांच्या दृष्टीने कशी आहेत?” यावर चर्चा केली. एक उत्पादन बंद करून नवीन उत्पादन कसे असावे अश्या मुद्द्यावर चांगली चर्चा झाली. बुडीत खात्याचा भरणा “फायद्याचा ठरला” कारण इतकी चांगली चर्चा गेल्या वर्षभरात झाली नव्हती! 

असाच एक शेअर्सचा किस्सा आहे. तेव्हा आयटी कंपन्यांचे शेअर खूप चांगले सुरु होते. महिन्या काठी ३० ते ४० टक्क्याचा नफा मिळत होता. चर्चा करून, अभ्यास करून एका खूप चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये १० लाख गुंतवणूक केली. साधारण दीड आठवड्यानंतर अमेरिकन राष्ट्रअध्यक्षाने काही नवीन निर्णय घेतले व भारतातील आयटीच्या क्षेत्राला जबरदस्त झटका मिळाला. शेअरचे भाव भारंभार कोसळले. माझ्या १० लाखाच्या गुतंवणूकीची किंमत उरली फक्त ३.५ लाख. साडे सहा लाखाचा गंडा लागला. आता काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. एव्हडा अभ्यास करून घेतलेला निर्णय अशा पद्धतीने आंगलट आल्याने भयंकर मनस्ताप झाला. स्वत:वरचा व शेअर मार्केटवरचा विश्वास कमी झाला. वडिलांनी धीर दिला, "जे झाले ते झाले, आहे तेव्हढा पैसा काढून घे व नवीन ठिकाणी गुंतवणूक कर!" भारतीय कार उद्योगाला भरभराट येईल असे दिसत होते. आयटीतील साडेतीन लाखांपैकी तीन लाख काढून कारचे स्पेअरपार्ट बनवणाऱ्या कंपनीत टाकले. आता चार वर्षानंतर त्या गुंतवणूकीची किंमत २२ लाख आहे. आयटीत सोडलेले ५० हजार अजूनहि ७५ च्या पुढे मजल मारू शकलेले नाहीत! आता हि पंचात्तर हजाराची बुडीत खाते गुंतवणूक मोकळी करून “रासायनिक खतांच्या कंपनीच्या शेअर्स मध्ये” गुंतवणूक करायचा माझा निश्चय आहे कारण या क्षेत्रावरील सरकारी नियंत्रण दिवसेंदिवस कमी होते आहे. खतांचे भाव वाढत आहेत. शेतकरी जागृत होत आहेत. स्वयंचलित खतदेण्याची प्रणाली विकसित झाली आहे. इथली गुंतवणूक पुढील पाच वर्षात खूप फायदेशीर असेल हे निश्चित वाटते आहे.



लग्नाला तीन वर्ष होऊनही माझा एक मित्र जेमतेम दोन महिने संसार करू शकला होता. या दोन महिन्यात लग्नानंतर १५ दिवसाचे हनिमून देखील धरले आहे. त्याची पत्नी नांदायलाच तयार नव्हती. हनिमून वरून आल्यावर दोन दिवसात ती “आई-बाबांची” आठवण येते म्हणून माहेरी गेली, “तीन महिने” आलीच नाही. तिला आणायला जायचे म्हणून याने आठवडाभर सासरवाडीत मुक्काम केला, तिकडच्या सगळ्या नातेवाईकांकडे “भेटीगाठी” दिल्या व तिला सोबत घेवून आला. आठ-दहा दिवसात त्याची पत्नी परत माहेरी गेली. तिने तिकडेच कसल्यातरी कोर्सला प्रवेश घेतला. तो कोर्स ती सासरी राहून देखील करू शकत होती. सहा महिन्याचा कोर्स! अशी टंगळ-मंगळ सुरु आहे. एकदोन वेळा खटके देखील उडाले पण बात सुधरायला तयार नाही. तो म्हणतो “अरे मी तीन वर्षे दिली आहेत, असा कसा संसार मोडू. नाते कसे तोडू?”. खरे पहिले तर नाते आहे तरी कुठे? त्यातली भेटीची ओढ, एकमेकासाठी काही करायची जिद्द? मुला-बाळांची स्वप्न? “हे नाते बुडीत खाते आहे.” त्याला सर्वांनी समजावून सांगितले. असे निर्णय ज्याने-त्याने स्वत:च्या जबाबदारीवर घ्यायचे असतात! आई-वडील-मित्र-नातेवाईक यात काय करणार? 


कांद्याचे भाव गगनाला भिडलेत तेव्हा कांदाच लावावा या विचाराने मामाने १५ एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. यासाठी त्याला भरपूर खर्च आला. पाण्याची व्यवस्था असल्याने त्याने हिम्मत केली खरी पण एका बाजूच्या कांद्यात काही रोग आला. पिक करपू लागेल. तज्ञांनी भेट दिली व सुचवले कि तीन एकरावरील पिक काढून टाकावे. “इतका खर्च केला?” मामाचे मन मानत नव्हते. “भरखते व जोरखते अजून तितकीशी लागू पडलेली नाहीत, तीन एकरा वरील कांदा काढून टरबूज लावले तर थोडा खर्च होईल पण ऐन उन्हाळ्यात फायदा होईल.” “वाटल्यास वरचा खर्च मी देतो. मार्केटिंग मीच करेल. माझ्या खर्चावर १५ टक्के वाढ दे, मला तितके पुरे आहे.” मी सुचवले. तो तयार झाला. तीन महिन्यात फायदा समोर आला. कांद्याचे भाव गदगडले पण टरबूज स्वत: मार्केटिंग केल्याने २० रु किलो ने विकण्यात यश आले. बुडीत खात्याचा वेळीच भरणा केल्याने “चांगला नफा झाला”.

मित्रहो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, बुडीत खात्याचा वेळीच भरणा करा व आपले हात मोकळे करून घ्या जेणेकरून मोकळ्या हाताने चांगली कामे करता येतील. आजच तुमची बुडीत खाते ओळखा व कामाला लागा!

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद