फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

हि अंधश्रद्धा आहे का?


राजस्थानातील एका गावात जन्माला आलेल्या मुलीला चार हात होते. तिला देवीचे रूप मानले गेले. नाव ठेवले "दुर्गा". थेट बंगाल, महाराष्ट्रातील लोकं दुर्गाचे दर्शन घ्यायला धावू लागले. तिचे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या.

सुकीबाईंच्या सुनेला लग्नानंतर पाच वर्ष होऊनही बाळ होत नव्हत. सुकीबाई दर्शनाला राजस्थानला आल्या व परतल्यावर दोन महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली.

दशरथला नोकरी मिळत नव्हती. भाड्याला पैसे नव्हते, उधार उसनवार करून त्याचे वडील राजस्थानला जावून आले. दोन महिन्यात दशरथला नोकरी लागली.

अश्या अनेक बातम्या नित्य कानी पडत होत्या. तिकडे दुर्गेच्या दर्शनाला चार चार दिवस रांगेत लागावे लागत होते. दोन वर्ष हे सुरु होते. शेवटी दुर्गा दगावली व हे प्रकरण बंद पडले.

बबन एक उत्तम शेतकरी होता. त्याची दीड एकर शेती होती. तो नित्य वेगवेगळ्या पिकांची निवड करी. संतुलित खत मात्रा, मृदा सुधार व नेमके जलव्यवस्थापन यातून त्याने निवडलेले प्रत्येक पिक भरगोस उत्पादन देई. उत्पादनाची तो अनेक पद्धतीने मार्केटिंग करीत असे. बोलका व यशस्वी असल्याने तो इतर शेतकरी बांधवांना सल्ला देखील देई. इतरांच्या शेतात भेट देवून सल्ला देण्याची तो फी घेत असे.

स्वत:च्या शेतात काम  काम करते वेळी पिकाच्या सळसळ मध्ये त्याला माणसांच्या फुसूफुसण्याचा आवाज येवू लागला. एकदा त्याला त्याच्या स्वर्गवासी आईचा आवाज ऐकू आला. बबन ए बब...कसा आहेत तू बाळा? हि बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली व लोकं त्याला आपल्या शेतात आपआपल्या मृत परीजनांचा संदेश ऐकण्यासाठी देखील बोलवू लागले. तो यासाठी कुठलीही फी आकारत नाही.
केशव एक केळी उत्पादक होता. श्रीमंत होता. त्याच्या गावात अनेक केळी उत्पादक श्रीमंतच होते. केशवला कशाची कमी नव्हती. पण नित्याच्या जीवनाचा त्याला कंटाळा आला होता. एकदिवस शेतात फेरफटका मारता मारता त्याला केळीच्या एका खोडावर गणपतीबाप्पा दिसला. त्याने माणसाकरवी हि बातमी घरी कळवली. गावातून लोंढेच्या लोंढे शेतात येवू लागले. हातात पुजेची थाळी, प्रसाद.  केशवच्या जीवनात अचानकच एक उर्जा निर्माण झाली. 

सुकीबाई राजस्थानला गेल्यामुळे इकडे त्यांच्या सुनेला व मुलाला बऱ्यापैकी एकांत मिळाला! निसर्गाने आपले काम केले. आपल्या नोकरीसाठी वडिलांचा काथ्याकूट सुरु आहे हे लक्षात आल्याने दशरथ ने जास्त पगाराची हाव सोडली व कमी पगारावर काम करण्यास राजी झाला. खरं बघितले तर दुर्गेचे दर्शन घेणाऱ्या हजारो लोकांपैकी मोजक्यालोकांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या पण ज्यांच्या मनोकामना पूर्ण होत नव्हत्या त्यांची बातमी देखील बनत नव्हती. बबनने आपल्या अनुभवातून लोकांना सल्ला द्यायचा. त्यासाठी त्याला शेतांची भेट घेणे आवश्यक असे. चांगले पिक येवूनही त्याच्या सल्ल्याचा प्रचार प्रसार हवा तसा होत नव्हता. फी देखील तितकीशी मिळत नव्हती. प्रीयजनाच्या संदेश ऐकायची त्याची क्षमता लोकांना माहित झाल्यावर त्याचा प्रसार वेगाने झाला. केशवच्या समृद्ध पण एकसुरी जीवनात बाप्पाच्या दर्शनामुळे नवीन उर्जा निर्माण झाली.     

तुम्हाल असा अनुभव आहे का? तुम्हाला ढगात व दगडात माणसांचे व प्राण्यांचे आकार दिसतात का? मृत नातेवाईकांची हक ऐकू येते का? हे अगदी नॉर्मल आहे. माणसाचा मेंदू सातत्याने अशा प्रकारच्या पॅटर्नचा शोध घेत असतो. हे आपल्याला नकळत सुरु असते. समजा असा एखादा पॅटर्न नाहीच दिसला तर माणसाचा मेंदू काही तरी नवीन शोधूनच काढतो.

सिनेमात तुम्ही असे सीन नेहमी बघू शकता. हॉलिडे या सिनेमांत अक्षय कुमारचे पात्र एका कागदाच्या तुकड्यावर असाच एक पॅटर्न शोधून काढते. त्यात दाखवलेल्या बिंदूंचा व मुंबईच्या नकाशाला जोडून तो अतिरेक्यांचा डाव ओळखतो. अर्थात तो एक सिनेमाच होता.

मित्रहो, जेव्हाहि तुमच्या लक्षात असा एखादा पॅटर्न येतो तेव्हा हे लक्षात घ्या कि आपला मेंदू सातत्याने पॅटर्नचा शोध घेत होता. हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला हा मात्र योगायोग आहे. या आधारावर तुम्ही स्वत:फसू नका किंवा इतर कुणाची फसवणूक देखील करू नका.

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद